काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी’, स्वित्झर्लंडमध्ये भारावलेली मराठी माणसं आणि मुख्यमंत्री
 
दावोस   : जागतिक आर्थिक परिषद – वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची 2024 ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या या भारतींयांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठ्या आपुलकीने स्वागत करण्याचे निश्चित केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरीक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला आहे. या निमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. या परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मराठी भाषिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या पहिल्या भेटीवेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत गायलं. मुख्यमंत्र्यांनी हे गीत ट्विटरवर शेअर केलं आहे.
बृहन्महाराष्ट्र स्विट्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत. इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, हे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत”, असं अमोल सावरकर म्हणाले.
स्वित्झर्लंडमधील मराठी नागरिकांकडून आनंद व्यक्त
मुळचे लातूरचे असलेले महेश बिराजदार यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आनंद व्यक्त केलाय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
स्विट्झर्लंडच्या महाराष्ट्र मंडळच्या पदाधिकारी श्रीमती किर्तीमालिनी गद्रे यांनीदेखील आनंद व्यक्त केला. “मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे, याचाही खूप मोठा आनंद आहे”, असं श्रीमती किर्तीमालिनी गद्रे म्हणाल्या.
झुरीक येथे वास्तव्यास असलेल शेखर काकडे, त्यांच्या पत्नी विद्या आणि कन्या बिल्वा काकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले आहे. “आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री शिंदे स्विट्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्विट्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने स्वागत करतो, आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो”, असं ते म्हणाले.
प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत.