198 किलो कांद्यावर शेतकऱ्याच्या हाती फक्त 22 रुपये! नाना पटोलेंनी फडणवीस सरकारची केली जोरदार पोलखोल
आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे” असे दावे करणाऱ्या फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय भाव मिळतो,
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था किती भयावह आहे, याचं धक्कादायक वास्तव काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समोर आणलं आहे. “आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे” असे दावे करणाऱ्या फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय भाव मिळतो, याची त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर पोलखोल केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडजळगाव येथील शेतकरी गोरक्ष दराडे यांनी चार गोणी कांदे बाजारात विक्रीसाठी नेले. तब्बल 198 किलो कांदा विकल्यानंतर त्यांना मिळाले फक्त 298 रुपये, तर वाहतूक, हमाली व इतर खर्च वजा जाता निव्वळ 22 रुपयेच हाती राहिले. ही घटना म्हणजे सरकारच्या अपयशाचं जिवंत उदाहरण असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
नाना पटोलेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं की,
कांद्याच्या एका गोणीसाठीच 160 रुपये खर्च येतो. म्हणजे शेतकऱ्याने माल विकून काहीच कमावलं नाही, उलट तो अधिक तोट्यात गेला. अर्धा एकर कांद्याच्या पिकासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो आणि त्याच्या मोबदल्यात जर केवळ 22 रुपये मिळत असतील, तर ही केवळ शोकांतिका नसून व्यवस्थेचं भीषण अपयश आहे.
“हे कुठलं शेतकरी हिताचं सरकार आहे?” असा थेट सवाल करत पटोले म्हणाले की,
शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळतो, मात्र बाजारातील दलाल, व्यापारी आणि यंत्रणा मात्र सुस्थितीत आहेत. सरकार मोठमोठ्या घोषणा करते, जाहिरातींमध्ये शेतकऱ्यांचा फोटो झळकवते, पण प्रत्यक्षात शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार डोळेझाक करत आहे.
हमीभावाची ठोस अंमलबजावणी नाही, उत्पादन खर्चावर आधारित दर नाहीत आणि बाजार व्यवस्थेवर कोणतंही नियंत्रण नाही ,सगळं काही फक्त कागदावरच आहे, असा आरोपही पटोलेंनी केला.
निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केलेली कर्जमाफी जूनपर्यंत जाहीर केली जाईल, असं सरकार म्हणत असलं तरी तोपर्यंत कित्येक शेतकरी अधिक कर्जबाजारी होतील, याची जाणीव सरकारला आहे का? असा सवाल उपस्थित करत, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतीमालाला गॅरंटेड हमीभाव देणारा कायदा करावा, अशी ठाम मागणी नाना पटोलेंनी केली आहे.
“198 किलो कांदा 298 रुपयांना विकावा लागणं हेच या सरकारच्या शेतकरी धोरणाचं विदारक वास्तव आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.