संत्रा प्रक्रिया केंद्र निर्मितीला मंजुरीमुळे शेतकरी सुखावला
 
Buldhana News :संग्रामपूर तालुक्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतिची फळे देश आणि परदेशात पाठवणे सुलभ होईल,
अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा केली होती. उपरोक्त पाच ठिकाणांपैकी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे देखील हे प्रक्रिया केंद्र उभारल्या जाणार असल्याने जिल्हा व तालुकावासीयांसाठी ही मोठी बाब मानली जात आहे.
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाच्या वतीने संत्रा उत्पादक असलेल्या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणीची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याचा समावेश होता. त्या घोषणेनंतर बुधवारी या बाबत आदेश निघाले आहेत. या प्रक्रिया केंद्रामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.
या योजनेचा लाभ सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी उद्योजक घेऊ शकतील. सदर योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी राज्य शासनामार्फत देण्यात येणारे अर्थसाह्य हे अनुदान स्वरूपात असेल. उपरोक्त प्रकल्पांपैकी निवड केलेल्या प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या किमान १५ टक्के स्वनिधी खर्च करणे आवश्यक राहील.
लाभार्थ्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार उर्वरित ८५ टक्के अर्थसाह्य बँकेकडून कर्ज स्वरूपात मंजूर करून घ्यावे. प्रकल्प पूर्ण करून, पूर्णत्वाचा दाखला पणन मंडळामार्फत शासनास सादर झाल्यानंतर, शासनाकडून प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतचे अनुदान देण्यात येईल. सदरचे अनुदान हे लाभार्थीच्या बँक खाते/कर्ज खात्यात जमा करण्यात येईल.
आमदार कुटे यांचा पाठपुरावा
या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी मांडून, जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी या भागाचे आमदार संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रश्न सातत्याने शासनदरबारी रेटून धरला होता.