नाशिकमध्ये FDA अॅक्शन मोडवर ; शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Nashik FDA Raid : गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दुध व दुग्धजन्यपदार्थ जसे की पनीर, खवा, मावा इ. खाद्य पदार्थाची प्रचंड मागणी असते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील बनावट पनीर बनवणाऱ्या पेढीवर धाड टाकत 47 हजार 800 रूपये किंमतीचा 239 किलो पनीरचा साठा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड, नाशिक येथील मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट नं. 308, साईग्राम कॉलनी अंबड, नाशिक या पेढीमध्ये बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाने पेढीची तपासणी करुन पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा 239 किलो ग्रॅम इतका साठा जप्त करण्यात आला.
शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट
अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणी कामी पाठविण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेला संशयित पनीरचा साठा हा नाशवंत असल्याने व तो परत खाण्याच्या उपयोगात येवू नये याकरीता त्यावर निळ टाकण्यात येवून साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत नष्ट करण्यात आला. पनीर या अन्न पदार्थाचा नमुना पाठविण्यात विश्लेषणासाठी आला असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदिप तोरणे, सुहास मंडलिक यांनी विनोद धवड, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थित व महेश चौधरी, सह आयुक्त (अन्न) नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एफडीएची पथके शहरातील पनीर उत्पादक व विक्रेते, यांच्यावर लक्ष ठेवणार असून तपासणी करणार आहेत.
बनावट पनीर संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
दरम्यान, चीज अॅनालॉग अर्थात बनावट पनीर संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या लक्षवेधीनंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात सर्रास वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाने आरोग्यास धोका निर्माण झाला असून विक्रमसिंह पाचपुतेंनी सभागृहात बनावट पनीर दाखवले होते. नियोजन, वित्त, गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आजच्या बैठकीस हजेरी लावणार आहेत. विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच एफडीए आयुक्तांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजच्या बैठकीनंतर कोणते महत्त्वाचे आदेश दिले जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.