फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण शिबिरे – निर्यातीस चालना देण्याचे निर्देश; तळेगाव दाभाडे येथे मंत्री जयकुमार रावल यांचा आढावा

पुणे: फुल उत्पादक शेतकरी कंपन्यांच्या सबलीकरणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, यामुळे फुल निर्यातीला चालना मिळेल, असे निर्देश राज्याचे पणन मंत्री व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिले. तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस संस्थेचे सचिव व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले की, संस्थेत त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच सुरू होणार असून, त्यातून उत्पन्नवाढीस गती मिळणार आहे. नेदरलँड, इजराईल, जपान, तांजानिया या देशांतील विद्यापीठांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. तसेच आफ्रिका खंडातील देशांतील कृषी विभागाशी संपर्क साधून तेथील शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण द्यावे.
राज्यातील साखर कारखाने संस्थेचे सभासद होऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवतील. यासोबतच कृषी पर्यटन, नॅचरोपॅथी, बांबू मूल्यवर्धन केंद्रातील बांबू सायकल चा प्रायोगिक वापर अशा विविध उपक्रमांना चालना देण्याचे मार्गदर्शन रावल यांनी केले.
बैठकीदरम्यान मंत्री रावल यांनी डिजिटल क्लासरूम, उपहारगृह, विस्तारित शीतगृह इमारत, निवासी सुविधा, एमबीए महाविद्यालय, प्रयोगशाळा यांची पाहणी केली. संचालक मिलिंद आकरे यांनी २०२६ पर्यंतच्या प्रशिक्षण आराखड्याचे सादरीकरण केले.