कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेची बनावट किल्ली बनवून 15 लाखांवर जबरी चोरी
KDCC Bank Robbery : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (केडीसीसी) नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील शाखेत जबरी चोरी झाल्याची माहिती उघड झाली आहे. ही घटना शनिवारी (ता. ५) मध्यरात्री घडली दरम्यान या शाखेसह लागून असलेल्या पोस्ट ऑफिसमध्येही चोरी झाली आहे. याचबरोबर जवळच्या महावितरण कार्यालयातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला परंतु याठिकाणी काही सापडले नसल्याने कागदपत्रे विस्कटून चोर पसार झाल्याची माहिती आहे.
दरम्यान केडीसीसीच्या नांगनूर शाखेतील रोख पाच लाख ८६ हजार रुपये आणि १० लाखांहून अधिक किमतीचे १७.७ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. दरम्यान, शाखेजवळच्याच पोस्ट ऑफिसमधूनही चोरट्यांनी सहा हजार ३९० रुपये चोरले आहेत. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, कर्नाटकातील संकेश्वर हद्दीलगत नांगनूर येथील मुख्य बाजारपेठेत हिरण्यकेशी दूध संस्थेच्या व्यापारी - संकुलातील पहिल्या मजल्यावर केडीसीसी शाखा, पोस्ट ऑफिस व महावितरणचे कार्यालय भाडेतत्त्वावर आहे. या तिन्ही कार्यालयामध्ये चोरांनी धुमाकूळ घातल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान केडीसीसीच्या शाखेतील शिल्लक रोकड आणि किमती ऐवज ठेवण्यासाठी बँकेत तिजोरी आहे. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने बनावट किल्लीने तिजोरी उघडून त्यातील पाच लाख ८६ हजार रोख आणि सोनेतारण कर्जापोटी जमा असलेले १७.७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरले.
केडीसीसी शाखेजवळच असलेले पोस्ट कार्यालयसुद्धा चोरट्यांनी लक्ष्य केले. तेथील तिजोरी उचकटून सहा हजार ३९० रुपये चोरले. महावितरण कार्यालयातही गेलेल्या चोरट्यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही. त्यांनी केवळ साहित्य विस्कटल्याची माहिती देण्यात आली.