मराठवाड्यात 24 तासांत 65 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

नांदेड जिल्हा सर्वाधिक प्रभावित शेतशिवार जलमय, प्रशासन सतर्क
मराठवाडा | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क
गेल्या २४ तासांपासून मराठवाड्यात वरुणराजाचा जोर दिसून आला असून एकूण ६५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३३ मंडळं, हिंगोली जिल्ह्यात १०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ आणि जालना जिल्ह्यातील ३ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत शेतशिवार जलमय झाले असून, काही ठिकाणी रस्ते आणि नाल्यांचे पाणी ओसंडून वाहताना दिसले. पिकांवर याचा संभाव्य परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती प्राप्त झालेली नाही.
प्रशासन सतर्क:
जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, तलाठ्यांपासून ते कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर संभाव्य नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात पूरजन्य स्थिती टाळण्यासाठी नाल्यांची साफसफाई व अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली:
खरीप हंगाम सुरू असताना पडणाऱ्या अशा तीव्र पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही भागात नुकतेच बी-बियाणे टाकण्यात आले असताना जोरदार पावसामुळे ते वाहून गेले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हवामान खात्याचा अंदाज:
पुढील ४८ तास मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.