हनीट्रॅपचा केंद्रबिंदू ठाणे-नवी मुंबई, 72 वरिष्ठ अधिकारी जाळ्यात IPS, DCP, महापालिका व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी फसले

एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : राज्यभरात हनीट्रॅप प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण आता अधिक गंभीर व धक्कादायक वळण घेत आहे. प्राप्त माहितीनुसार, तब्बल ७२ पोलीस व प्रशासकीय अधिकारी एका महिलेच्या हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले असून, या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठाणे व नवी मुंबई असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित महिला ही ठाणे परिसरातील रहिवासी असून, तिने विविध पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्कार, सामूहिक बलात्कार, लग्नाचे आमिष, अश्लील चॅटिंग अशा गंभीर आरोपांसह तक्रारी दाखल केल्या. मात्र, तक्रारीनंतर त्या “गैरसमजातून झाल्या” असे सांगून अर्ज मागे घेण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत.
खंडणीसाठी वापरले ‘हनीट्रॅप’चे तंत्र
महिला स्वतःला माजी पोलीस कर्मचारी, विधवा किंवा होमगार्ड म्हणून भासवून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक साधत असे. त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडीओ कॉल्स आणि गुप्त भेटींमधून तिचा विश्वास वाढवत ती हिडन कॅमेऱ्यांनी अश्लील क्लिप्स रेकॉर्ड करत असे. त्यानंतर या व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची खंडणी उकळली जात असे.
IPS, DCP स्तरावरील अधिकारीही बळी
एका प्रकरणात, तिने एक आयपीएस अधिकारी हॉटेलमध्ये बोलावून, कपडे काढून व्हिडीओ शूट केला. याच व्हिडीओचा वापर करून खंडणी मागितली गेल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या प्रकरणात, तिने दोन उपायुक्तांविरोधात बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तक्रारी दाखल करून, नंतर तडजोड करत त्या मागे घेतल्या.
पूर्वीही अटक… तरीही सवय कायम
या महिलेविरोधात २०१६ मध्ये खंडणीप्रकरणी अटक झाली होती. त्यावेळी तिने एका व्यवसायिकाकडून १.५ लाख रुपये मागितले होते. पोलिसांनी सापळा रचून १० हजारांच्या हप्त्यासह तिला अटक केली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तिने पुन्हा हनीट्रॅपद्वारे खंडणी उपटण्याचे सत्र सुरू केले.
प्रशासकीय यंत्रणांमध्ये चिंतेची लाट
या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील पोलीस व प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी, जे स्वतः गुन्हेगारांना पकडतात, तेच आता हनीट्रॅपच्या जाळ्यात सापडून ब्लॅकमेलिंगचे शिकार होत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.या प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. महिला अधिकारी व पुरुष अधिकारी यांच्यातील व्यावसायिक मर्यादा स्पष्ट करणारी धोरणं व प्रशिक्षण देणे आता काळाची गरज बनली आहे.
#HoneyTrap #Thane #NaviMumbai #PoliceScandal #BreakingNews #MarathiNews #विधीमंडळ