मुंबईत किती कोटी मराठे येणार?, मनोज जरांगे यांनी आकडाच सांगितला, म्हणाले, देव जरी आला तरी…
मनोज जरांगे पाटील यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी मराठा समाजाला मुंबईत येण्याचं आवाहन केलं. मोठ्या संख्येने मुंबईत या. जाळपोळ करू नका. उपद्रव करू नका. शांततेत या आणि शांततेत जा, असं सांगतानाच देव जरी आला तरी आरक्षण घेणारच. आता आरक्षणाशिवाय माघार नाहीच, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे बीड येथील विशाल रॅलीतून बोलत होते. येत्या 20 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहे. त्यावेळी मला भेटायला मराठा समाज येणार आहे. आता मराठ्याला दबणं सोपं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. शांततेत यायचं आणि शांततेत जायचं. मला फसवू नका. कापूस वेचून घ्या, शेतातील कामे नीट करा. मराठ्याचा जनसागर मुंबईत उसळणार आहे. अंतरवलीतून मुंबईकडे जायचं आहे. आमचा ताफा जसा येईल तस तसं आम्हाला सामील व्हा. आहे त्या गावातून सामील व्हा. रात्री रस्त्यावर झोपा, असं मनोज जरांगे म्हणाले.
पोलिसांना सहकार्य करा…
आजूबाजूला लक्ष ठेवा. कोणी दंगा करत असेल. गाडी पेटवत असेल तर त्याला पोलिसांच्या हवाली करा. पोलिसांना सहकार्य करा. सरकारला सहकार्य करायची गरज नाही. येताना सोबत शिधा ठेवा. सरकारने आमच्या शौचालयाची व्यवस्था करावी. तीन कोटी मराठे मुंबईत येणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांना गुलाल लागू देऊ नका
हा महाप्रलय मोठा असेल. त्यामुळे सरकारला मराठ्यांना आवरता येणार नाही. अटक तर करताच येणार नाही. फक्त जाळपोळ करू नका. मराठ्यांच्या मुळावर कोण आहे हे मला माहीत आहे. चारपाच लोक आहेत. त्यांना गुलाल लागू देऊ नका. त्यांची नावे मी लवकरच जाहीर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दहा दिवसात आरक्षण द्या
मराठ्यांच्या पाठी उभा नाही राहिला तर मराठ्यांचं घर तुम्हाला कायमस्वरुपी बंद राहील. तुम्ही ताकदीने मदतीला या. ते लोक उभे आहेत. तुम्हीही या. दहा दिवसात मराठ्यांना आरक्षण द्या. एकदा अंतरवलीतून गाव सोडलं तर येताना आरक्षणच घेणार. तुमची आमची चर्चा बंद. तुम्ही आरक्षण नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार की तुम्हाला या खुट्या आयुष्यभर काढता येणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी दिला.
परस्पर बैठका घेऊ नका
कुणीही परस्पर बैठका घ्यायच्या नाहीत. कोणीही मधल्या काळात आरक्षणासाठी आंदोलन करायचं नाही. वेगळी आंदोलने करू नका. स्टेटमेंट देऊ नका. मराठ्यांसोबत चला. वेगळंपण दाखवू नका. नाटकं बंद करा. सवतेसुभे मांडू नका. आपल्यात नेताबिता कोणी नाही. मीही स्वत:ला नेता मानत नाही, असं ते म्हणाले.
आम्हाला आडवणारे तुम्ही कोण?
मुंबईत येताना ट्रॅक्टर आडवणाऱ्याला मारू नका. त्याला पकडा. ट्रॅक्टरमध्ये टाका. मुंबईला आंदोलनात आणा. त्याला खाऊ पिऊ घाला. बेसन द्या, भाकरी द्या. पण त्याला कांदा देऊ नका. तुम्ही कशाला आमचे ट्रॅक्टर अडवता? ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, ससेहोलपट आमची, आडवणारे तुम्ही कोण?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
येडपटाला म्हणा घरी बस
एकदा मुंबईत आल्यावर हा मराठ्यांचा समुदाय पुन्हा मागे फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. देव जरी आला तरी आरक्षण घेणार. मराठ्यांनो शांततेत चला. तुमच्या आंदोलनाची धूळ जरी उडाली तरी सरकार गावाकडे येईल. येडपटाला म्हणा आता मध्ये बोलू नको. शांत राहा. नीट झोप. आडवंतिडवं बोलू नको. येडपटाला सांगा घरी गप्प बस, असं ते म्हणाले.