मुंबईकरांना पावसासाठी किती दिवस करावी लागणार प्रतीक्षा? हवामान विभागाकडून अलर्ट
-पुढील आठवड्यापासून राज्यात पावसाचं धुमशान होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात मान्सून दाखल होताच तीन-चार दिवस जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाची गती कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून अनेक भागात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, काही भागात रिमझिम पाऊस झाला आहे. दरम्यान असे असताना आता 19 तारखेनंतर राज्यात पावसाचा वेग वाढण्याचे संकेत आहे. विशेष म्हणजे अनेक भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या करून ठेवल्या आहे. त्यामुळे आता जोरदार पावसाची नितांत गरज आहे.
दरम्यान नागरिकांनी चांगली बातमी आहे ,येत्या दोन दिवसात 19 जूनपासून कोकणात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत 21 जूनपासून जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात पावसाचं धुमशान होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईबद्दल सांगायचं झाल्यास आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या सुषमा नायर यांनी दिली. 
जूनचा अर्धा महिना पूर्ण झाला तरीही अद्याप महाराष्ट्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. यावर्षी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र सध्यातरी अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने राज्यातील अनेक धरणं अजूनही कोरडीच आहे. त्यामुळे अर्धा जून महिना संपला असतानाही राज्यात केवळ 20.24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ज्यात सर्वाधिक कमी पाणीसाठा मराठवाड्यात आहे. बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक धरणांनी तळ गाठला आहे.