90 किमी वेगाच्या वाऱ्यांचा थरार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
IMDचा अलर्ट : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुढील 6 दिवस वादळी पावसाची शक्यता
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस हवामान आणखी बिघडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, देशातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी 90 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बंगाल-ओडिशात वादळी पावसाचा अंदाज
1 ते 6 जूनदरम्यान पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील. देशभरात एकाचवेळी अनेक हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने वातावरणात मोठे बदल होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
उत्तर भारतात धुळीचे वादळ आणि गारपीटीची शक्यता
उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे हिमालयीन राज्ये, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. पाकिस्तान आणि राजस्थान परिसरातील चक्राकार वाऱ्यांमुळे गरम व थंड हवेचे मिश्रण वाढले असून धुळीचे वादळ आणि गारपीट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
काही भागांत 90 किमी वेगाने वाहणार वारे
पूर्व भारतातील दक्षिण गंगा मैदान, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये ताशी 40 ते 70 किमी वेगाने, तर काही ठिकाणी तब्बल 90 किमी वेगाने वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सहा चक्राकार प्रणाली सक्रिय
ईशान्य भारत आणि दक्षिण आसाम परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह दक्षिण भारतातही जोरदार पावसाचा अंदाज
दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशापासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महत्त्वाचे
* काही भागांत वाऱ्यांचा वेग 90 किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता
* विजांचा कडकडाट आणि गारपीटीचा इशारा
* महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य भारतात वादळी पावसाची शक्यता
* ईशान्य भारतात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
* नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन