भारताचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल उद्घाटन महाराष्ट्र समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल – मुख्यमंत्री फडणवीस

नवी मुंबई :
जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPA) येथील पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 चे उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरण, रायगड येथे प्रत्यक्ष उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जेएनपीए व पीएसए इंडियाच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले असून, वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर जेएनपीए जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल.”
या टर्मिनलमुळे भारताच्या सागरी व्यापाराच्या पायाभूत सुविधांना नवा अध्याय मिळाला असून, जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान होणार आहे. फेज-2 विस्तारामुळे बीएमसीटीची वार्षिक हाताळणी क्षमता 2.4 दशलक्ष टीईयूपासून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू झाली आहे. हे भारतातील पहिले 100% अक्षय ऊर्जेवर चालणारे आणि डीएफसी अनुरूप कंटेनर टर्मिनल आहे.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, पराग शहा, तसेच कस्टमचे चीफ कमिश्नर विनल श्रीवास्तव उपस्थित होते. जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी प्रास्ताविक केले.
उद्योगतज्ज्ञांच्या मते, अत्याधुनिक उपकरणे व बहुआयामी सुविधा असलेले हे टर्मिनल ‘गेम-चेंजर’ ठरेल आणि भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेत नवा टप्पा गाठेल.