“शिस्त, सुरक्षा आणि सन्मान – याच तत्वांवर स्वातंत्र्य दिन साजरा होणार” – जयकुमार रावल

“शिस्त, सुरक्षा आणि सन्मान – याच तत्वांवर स्वातंत्र्य दिन साजरा होणार” – जयकुमार रावल
-स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा आढावा: मंत्री जयकुमार रावल यांचे काटेकोर नियोजनाचे आदेश
मुंबई,   “स्वातंत्र्य दिन सोहळा हा केवळ उत्सव नव्हे, तर शिस्त आणि परंपरेचे प्रतीक आहे”, असे स्पष्ट करत राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज मंत्रालयात स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांना काटेकोर नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश दिले. मंत्री रावल म्हणाले, “कार्यक्रमात कुठेही अडथळा येणार नाही याची काळजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून घ्यावी.”
बैठकीस अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे, राजशिष्टाचार, सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रावल यांनी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था अधिक चोख ठेवणे, आणि सर्व निमंत्रितांचा सन्मान राखणे यावर भर दिला. जिल्हा स्तरावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने यादी वेळेत प्रसिद्ध करण्याची सूचनाही त्यांनी केली.
या वेळी उपसचिव हेमंत डांगे यांनी मंत्रालयातील मुख्य कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली तर म्हैसकर आणि त्रिमुखे यांनी आपापल्या विभागाच्या तयारीबाबत माहिती दिली.