Jaykumar Rawal : शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? पणनमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जयकुमार रावल Action मोडवर, घेतला पणन खात्याचा आढावा
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे. खातं जाहीर होताच त्या – त्या खात्याचे मंत्री अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मागील कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर महायुतीच्या शिवसेनेकडे असलेलं पणन खातं व पणन मंत्रीपद यावेळी महायुतीममधील भाजपला देण्यात आलं आहे. जयकुमार रावल हे राज्याचे नवे पणन मंत्री आहेत. दरम्यान रावल यांनी पदभार स्वीकारला आहे, यावेळी बोलताना त्यांनी आपल्या कामाची पुढील दिशा स्पष्ट केली.
शंभर दिवसांमध्ये पणन विभाग महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहिती यावेळी रावल यांनी दिली आहे .रावल यांनी पदभार स्वीकारल्यावर आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला येणाऱ्या काळात अच्छेदिन येणार असल्याची चर्चा बाजार आवारात होऊ लागली आहे .
नेमकं काय म्हणाले रावल ?
शेतकरी हिताला प्राधान्य देण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार असल्याचं, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. रावल यांनी मुंबईत पणन विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सर्व अधिका-यांनी शेतक-यांसाठी चांगल्या हेतूनं काम करून शेतमालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी तंत्रज्ञानावर भर द्यावा तसंच अधिका-यांनी संवेदनशीलपणे कामकाज करावं, त्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना रावल यांनी दिल्या. मार्केटींगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकिया आणि कार्यपध्दती राबवण्यावर भर दयावा, शेतमालाची साठवणूक वाहतुक आणि विक्री यासाठी आधुनिक पध्दतीचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, त्यादृष्टीनं पणन विभागाकडून नियोजन करण्यात यावं असंही जयकुमार रावल यांनी सांगितलं. तसेच ज्या ज्या बाजार समितीमधील संचालक मंडळ पारदर्शकपणे काम करत नसतील त्या बाजार समित्यांचा रिपोर्ट मागवून सादर करावा अशी सूचना या आढावा बैठकीत पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.