जोगेश्वरीत उंच इमारतीला भीषण आग; चार मजले भक्ष्यस्थानी, जीवितहानी टळली!
.jpeg)
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा आगीचा कहर पाहायला मिळाला. जोगेश्वरी पश्चिमेतील बेहराम बाग परिसरातील जेएनएस बिझनेस पार्क या उंच व्यावसायिक इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली. या इमारतीतील चार मजले आगीच्या विळख्यात सापडले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सकाळी सुमारे 10:51 वाजता या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लेव्हल-2 घोषित करण्यात आली. अनेक फायर इंजिन्स, टँकर्स आणि जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरला होता. वरच्या मजल्यावर अडकलेल्या काही जणांनी मदतीसाठी हाका मारल्या. फायर ब्रिगेडच्या जवानांनी तत्परता दाखवत आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. आतापर्यंत 15 लोकांचा यशस्वी बचाव करण्यात आला असून, एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. जखमीचा उपचार जोगेश्वरी ट्रॉमा केअर हॉस्पिटल मध्ये सुरू आहे.
या इमारतीत फिजिओथेरपी डॉक्टरांचे क्लिनिक, हज-उमरा संबंधित कार्यालये आणि विविध व्यावसायिक आस्थापना आहेत. सध्या अजूनही काही लोक आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धुराचा फैलाव कमी करण्यासाठी काच तोडण्यात येत असून, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म आणि टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव आणि घबराट निर्माण झाली होती.
मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. फक्त दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील दोन स्वतंत्र आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही महानगरात आग लागण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.