Ladki Bahin Yojana : आतापर्यंत 5 लाख महिला अपात्र, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक 'बहिणी'

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील छाननी सुरू झाली असून बहिणीकडे किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवले जात असल्याची माहिती आहे. आतापर्यंत तब्बल पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून यातील सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. चारचाकी ‘गाडीवाल्या' लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असून आर्थिकदृष्टया सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे.
विशेष म्हणजे शासकीय कारवाईच्या भीतीने आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केले आहेत. ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता महिला विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत. सद्यस्थितीत चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू असून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची छाननी अद्याप सुरू झालेली नाही.