नेते रडले, कार्यकर्त्यांचा आक्रोश, सुप्रिया सुळे यांचा अखेर शरद पवार यांना फोन, काय-काय घडलं?
 
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल जाहीर होण्याचा कालावधी आता जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझ्या संगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषनेनंतर राष्ट्रवादी पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेच्या विरोधात कार्यकर्त्यांनी भर सभागृहात ठिय्या मांडला. तुम्ही राजीनामाचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्ते करत होते.
या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. पण इतर नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं. जयंत पाटील तर अक्षरश: रडले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रडू कोसळलं. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. आम्ही राजीनामा देतो पण आपण राजीनामा देऊ नका, अशी विनंती जयंत पाटील यांनी यावेळी केली. आपल्या नेत्यांची अस्वस्था पाहून कार्यकर्तेही भावूक झाले. त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावा, यासाठी विनंती केली. या विनंतीसाठी त्यांनी आंदोलनही पुकारलं.
कार्यकर्ते आक्रमक, काय-काय घडलं?
कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृबाहेर जाण्यास मज्जाव केला. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आपण त्यांना सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही, असं आक्रमक कार्यकर्ते अधिकारवाणीने म्हणाले. यावेळी अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांनी आपण शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढू. तुम्हाला अपेक्षित असाच मार्ग काढला जाईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. तरीही कार्यकर्ते तिथून हटायला तयार नव्हते.
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आपल्या कडक शब्दांमध्ये शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर शरद पवार यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यासाठी रस्ता करण्यात आला. शरद पवार सभागृहाबाहेर जात असताना कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचं सांगून जेवणाचं आवाहन करण्यात आलं. तसेच सभागृहात दुसऱ्या संस्थेचा कार्यक्रम असल्याने सभागृह सोडून जाण्यास आवाहन करण्यात आलं.
या दरम्यान शरद पवार सिल्व्हर ओकला निघून गेले. तर इतर दिग्गज नेत्यांची वाय.बी.चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. तर कार्यकर्ते बाय.बी. चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करत होती. वाय.बी.चव्हाण सेंटर येथील भेट आटोपून सुप्रिया सुळे आणि अजित पवार बाहेर आले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना जेवण करण्याचं आवाहन केलं. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या अवस्थेत नव्हते.
कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहून सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना फोन केला. यावेळी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जेवण करण्याचं आवाहन केलं. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थित नव्हते. यावेळी कार्यकर्ते, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात संभाषण झालं. पण आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नाही.