रम्मी’च्या पत्त्यांनी मंत्रीपद उडणार? माणिकराव कोकाटे यांचा शनिवारी राजीनामा?

- अजित पवार निर्णयाच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादीत खदखद वाढली!
मुंबई एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रम्मी खेळतानाचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात संतापाचे वारे उसळले आहेत. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीकेची झोड उठवली, तर सत्ताधारी गटातही नाराजीचा सूर स्पष्ट दिसून आला आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, कोकाटे शनिवारी राजीनामा देणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून पुढे आली असून यामुळे चर्चांना नवा उधाण आला आहे.
वाद हा ‘नविन’ नाही
मंत्रीपद मिळाल्यापासून कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे.
• “सरकारच्या पैशाने लग्न लावता का?”
• “पंचनामे काय ढेकळ्यांचे करायचे का?”
• “कृषी खातं म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी!”
या सर्व वक्तव्यांमुळे त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत, “मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीने संवेदनशील राहणे गरजेचे आहे,” असा सल्ला दिला. यासोबतच “अजित पवारच अंतिम निर्णय घेतील,” असं सूतोवाच करून राजीनाम्याचे संकेतही दिले.
अजित पवारांचा दौरा रद्द चर्चा वाढली
कोकाटे आज अजित पवारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, अजित पवारांनी अचानक मुंबई दौरा रद्द केला. हा दौरा खरोखरच रद्द झाला की मुद्दाम टाळला गेला, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या शनिवारपर्यंत कोकाटेंचा राजीनामा होण्याची शक्यता आहे. पक्षाची आणि सरकारची प्रतिमा धुळीस जात असल्याने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी राष्ट्रवादीत अंतर्गत हालचाली सुरू आहेत.राजकारणात वाद ही नवी गोष्ट नाही, मात्र सातत्याने वादात अडकलेला मंत्री, तोही कृषी विभागासारख्या संवेदनशील खात्याचा प्रमुख असलेला, हे सरकारसाठी डोकेदुखीचं कारण ठरतंय. आता अजित पवार काय निर्णय घेतात, यावर कोकाटेंचं भवितव्य ठरणार आहे.
#MaanikraoKokate #AjitPawar #PoliticalNews #MaharashtraPolitics #NCP #RummyControversy