राज्यात अतिवृष्टी; सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून शेती, घरं आणि पशुधनाच्या नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील सुमारे १२ ते १४ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणांना हायअलर्ट देण्यात आला असून नागरिकांना दर तीन तासांनी हवामानाबाबत अलर्ट पाठवले जात आहेत.
मुंबईत कालपासून अविरत पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल भाग पाण्याखाली गेले, लोकल वाहतूक ठप्प झाली. मिठी नदी धोका पातळी ओलांडल्याने ४०० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली.
दरम्यान, पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी शेजारील राज्यांशी समन्वय साधण्यात येत असून, तेलंगणासह विविध प्रकल्पांकडून राज्याला सहकार्य मिळत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.