सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; २४ तासांत १० जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर नंदुरबार, जळगाव, भंडारा, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांत १० जणांचा मृत्यू झाला असून, पूरग्रस्त भागातून तब्बल ११,८०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. नाशिकमध्ये ४ जणांचा, धाराशिव व अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी २ जणांचा तर जालना व यवतमाळमध्ये प्रत्येकी एका जणाचा बळी गेला आहे.
पालघरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांगलीत द्राक्ष व डाळिंब बागांमध्ये पाणी साचले असून, कोल्हापूर जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान झाले आहे.
आज सकाळपर्यंत रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये सर्वाधिक १३४ मिमी पाऊस, तर नाशिकच्या नंदगावमध्ये ११८ मिमी, ठाण्याच्या मुरबाडमध्ये १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. परभणी, बुलढाणा, जालना जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, ज्वारीसह भातपिके पाण्यात सडून गेल्याने हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे.