Mango,Cashew Park in Ratnagiri MIDC: रत्नागिरीत आंबा, काजू पार्कसाठी एमआयडीसीची ६०० कोटींची निविदा प्रसिद्ध
 
Mango,Cashew Park in Ratnagiri MIDC: मँगो पार्क, कॅश्यू पार्क, फूड पार्क रत्नागिरीत करणार, अशी घोषणा करण्यात आली होती, एमआयडीसीने या पार्कचे ६०० कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे.यातून हजार कोटींची गुंतवणूक या पार्कमध्ये केली जाणार आहे. यातील एक चतुर्थांश गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या उद्योजकांची नावे आपण त्यांच्याशी करार केल्यानंतर जाहीर करू, असे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच यातून सुमारे साडेचार हजार रोजगार जिल्ह्यात निर्माण होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.स्टरलाइटची ५०० एकर जागा येत्या एक-दोन महिन्यात एमआयडीसीच्या ताब्यात येईल. या जागेत तीन मोठे प्रकल्प आणण्याचा निर्णय बोर्डाच्या मीटिंगमध्ये घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकावर
दावोसमध्ये ३ लाख ७२ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. त्यापैकी निम्म्या प्रकल्पांना जागाही दिली. ह्युदाई कंपनी ७ हजार कोटींची गुंतवणूक पुण्यामध्ये करत आहे आणि ३ हजार कोटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये करत आहे. परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक सोडला नाही.