मणिपूरची घटना आणि देशाच्या ‘जीडीपी’चा घंटानाद
गेले तीन महिने जळणाऱ्या मणिपूरमध्ये दोन स्त्रियांना विवस्त्र करत त्यांची विटंबना करून धिंड काढणाऱ्या लांच्छनास्पद घटनेचा निषेध. खरे तर निषेध वगैरे शब्ददेखील अर्थहीन वाटू लागले आहेत. बऱ्याच वेळा देशातील सामाजिक, जातीय, धार्मिक, स्त्री अत्याचार विषयक घटनांचा अर्थकारणाशी काय संबंध, असा प्रश्न विचारला जातो.
खरेतर शुद्ध आर्थिक असे काही नसते सामाजिक, जातीय, धार्मिक, स्त्री अत्याचार अशा तथाकथित बिगर आर्थिक प्रश्नांचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक व्यवहारांवर होत असतो. अगदी मॅक्रो इकॉनॉमीपर्यंत जाऊन भिडतो.
मणिपूरची घटना एक पुरुष म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून लाज आणणारी आहे. पण एकूणच देशात जातीय, धार्मिक, वांशिक, भाषिक तणावात अधिकाधिक प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या साखळीतील ही अजून एक भयानक कडी आहे.