Manoj jarange patil | मनोज जरांगेंची मोठी घोषणा अन्न, पाणी सोडलं, मीडियाशी काय बोलले?
Manoj jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलय. त्यांनी उपोषणाला बसण्याआधी मीडियाशी संवाद साधला. जालन्यातील अंतरवली-सराटी येथे त्यांनी उपोषण सुरु केलय. याच ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केलय. राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलय.
“विशेष अधिवेशन बोलवा. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय, तो स्वीकारुन तुम्ही कायद्यात रुपांतर करा” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. “अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत. मी उपोषण मागे घेतलं, त्यावेळी गुन्हे मागे घेण्याच तुम्ही आश्वासन दिलं होतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आमच्यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतले, सरकारच्या मनात असेल तर काहीपण होऊ शकतं” असं ते म्हणाले. “शरीर साथ देतं, नाही देतं यापेक्षा माझा समाज मोठा आहे. एकाजीवाची किंमत करण्यापेक्षा करोडो जीवांची किंमत सरकारला करावी लागेल. एक जीव गेला तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेच उपोषण कसं असेल?
सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलीय, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. आत्ता 10 वाजल्यापासून उपोषण सुरु करतोय. उपचार, पाणी अन्न काही घेणार नाही. मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विशेष अधिवेशन बोलवून पण जरांगे पाटील उपोषणाला का बसतायत?
सरकारने 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलय, मग आता उपोषणाला बसण्याची गरज काय? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘सरकारने आधीच प्रक्रिया सुरु केली का? तर या प्रश्नाच उत्तर नाही आहे’ “तुम्ही 10 तारखेपासून प्रक्रिया सुरु केली, तर 14 तारखेला कायदा मंजूर करता येईल. 15 तारखेला अधिवेशन बोलवून एकादिवसात हे शक्य आहे का?” म्हणून उपोषणाला बसाव लागतय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.