मराठवाड्यात निसर्गाचा कहर! पावसाने 50 बळी, 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 15 लाख शेतकरी उद्ध्वस्त

छत्रपती संभाजीनगर :
यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यावर निसर्गाचा प्रचंड कहर ओसंडून पडला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू, तर तब्बल १५.७८ लाख शेतकरी कुटुंबांचे जगणे उद्ध्वस्त झाले आहे. विभागातील ५.६२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत.
नांदेड जिल्हा सर्वाधिक फटका बसलेला असून येथेच १८ मृत्यू आणि २.६२ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हिंगोलीत १.२४ लाख हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. विभागातील १,०४९ जनावरे दगावली, तर ३,३८८ घरे बाधित झाली असल्याचा अहवाल आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ जून ते ६ सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात ६०६.३ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ८.७ टक्के जास्त आहे. यामध्ये नांदेडमध्ये तर सरासरीपेक्षा २१.२ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला.
छत्रपती संभाजीनगरात ११, बीड व हिंगोलीत ६-६, परभणीत ५ आणि जालन्यात ३ मृत्यू झाले. दरम्यान प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचा ४५ टक्के पंचनामा पूर्ण केला असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.