बाजार समितीच्या उत्पन्नवाढीचा मंत्र —शिस्त, टीमवर्क आणि नव्या संधी : प्रशासक विकास रसाळ

एपीएमसी न्यूज नेटवर्क: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी   आगळावेगळं चित्र पाहायला मिळालं. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर बाजार समिती अधिकारी व कर्मचारी संघटनेने प्रथमच एकत्र येत नव्या प्रशासक व पणन संचालक विकास रसाळ यांचा सन्मान केला. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या हस्ते साल व पुष्पगुच्छ देऊन झालेला हा सत्कार केवळ औपचारिक नव्हता, तर बाजार समितीच्या भविष्यातील वाटचालीचा एक नवा अध्याय असल्याची जाणीव सर्वांना झाली.
“टीमवर्कशिवाय प्रगती अशक्य”
रसाळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की“बाजार समिती ही एका व्यक्तीची नव्हे तर सर्वांची आहे. शेतकरी, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी यांचं एकत्रित कामच संस्थेला पुढे नेणार आहे. बाहेर विकल्या जाणाऱ्या शेतमालाला समितीत आणणे, व्यवहारांमधून सेसची शंभर टक्के वसुली करणे आणि उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत शोधणे — यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.”
त्यांनी हेही ठामपणे नमूद केले की, शासनाचा स्पष्ट आदेश आहे की बाजार समित्यांनी आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावं. “पहिला आपल्या घराचा विकास, त्यानंतर बाहेरचं,” असा त्यांचा संदेश कर्मचाऱ्यांना होता.
या कार्यक्रमात माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी ज्वलंत मुद्दा मांडला. “नियमनमुक्त शेतमाल पुन्हा समितीच्या चौकटीत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. हा निर्णय अंमलात आला तर आमचे ३५० कर्मचारी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील. मात्र शिस्त ही अत्यावश्यक आहे. थोडा सैलपणा दिला तर सर्वजण त्याचा गैरफायदा घेतात. शिस्त लावली तर समितीचे उत्पन्न दुप्पट वाढू शकते,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
संचालक मंडळ गेल्याने बाजार घटकांमध्ये उत्साह आणि प्रशासक म्हणून रसाळ यांच्या नियुक्तीने कर्मचाऱ्यांच्या एकत्रित पाठींब्याने समितीत सकारात्मकता परतल्याचं चित्र दिसून आलं.
या बैठकीतून बाजार समितीच्या भविष्यासाठी काही महत्त्वाचे संकेत मिळाले —
• नियमनमुक्त शेतमाल पुन्हा समितीत आणण्याची हालचाल
• व्यवहारांमधून शंभर टक्के सेस वसुली
• नवीन उत्पन्न स्रोतांचा शोध
• शिस्तबद्ध कार्यपद्धतीची अंमलबजावणी
मुंबईसारख्या मोठ्या बाजार समितीच्या कार्यपद्धतीत शिस्त, पारदर्शकता आणि उत्पन्नवाढीचे नवे प्रयोग यशस्वी झाले, तर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि बाजार घटकांना होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.