शुक्रवारपर्यंत मान्सून होणार दाखल हवामान खात्याचा अंदाज
यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहू शकतो, अशी चर्चा सुरू असतानाच बंगालच्या उपसागरातील 'मोचा' चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैर्ऋत्य मोसमी वारे   दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.
शुक्रवारपर्यंत मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागने वर्तविली आहे.
दीर्घकालीन मॉन्सून दाखल होण्याच्या वेळा बघता दरवर्षी मॉन्सून साधारण २२ मे च्या दरम्यान अंदमानात दाखल होतो. त्यानंतर साधारण ७ जूनला राज्यात दाखल होतो.
यंदाही मॉन्सून वेळेवर दाखल होईल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मागील वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते. तळकोकणात ७ जून रोजी तर मुंबईमध्ये ११ जून रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.