श्रावणात महागाईचा अधिक मास; भाजीपला व डाळींसह विविध जिन्नस महाग झाल्याने सर्वसामान्यांचे हाल
 
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा भाजीपाल्याच्या लागवडीवर परिणाम झाला तर, जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे हाती येणारे पीक पाण्यात गेले. त्यामुळे भाज्यांची आवक बाजारात घटली असून त्याचा परिणाम दरवाढीमध्ये झाला आहे. त्यातच आता भाज्या व डाळींसह विविध जिन्नस महाग झाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. तूरडाळ, मूगडाळ, शेंगदाणा, साबुदाणा यांच्या दरांनी उसळी घेतली आहे तर, जिरा, लसूण, हळद, आले या फोडणी-मसाल्यासाठीच्या जिन्नसांचे दरही चांगलेच वाढले आहेत.
धान्य तसेच अन्य जिन्नसांच्या दरांची गेल्या महिन्यातील दरांशी तुलना केल्यास ही वाढ सहज दिसून येते. गेल्यावर्षीच्या ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातील घाऊक दरांशी तुलना करता दरांमध्ये १५ ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. वर्षभरात लसणाचे दर किलोमागे ३०० टक्क्यांनी महागल्याचे केंद्र सरकारच्या ‘अॅगमार्कनेट’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसते. त्याचप्रमाणे जिऱ्याचे दरही एक वर्षांपूर्वीच्या २०० रुपये किलोवरून सध्या ६५० ते ७०० रुपये किलोवर पोहोचल्याचे या संकेतस्थळावर दिसते. अशीच वाढ साखर, शेंगदाणे, साबुदाणा, शेंगदाणे तेल यांच्या दरांतही दिसून येते.
मराठवाडय़ात पाऊस नसल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. लातूरच्या बाजारपेठेत डाळींचे भाव वाढले असून २० जुलैदरम्यान घाऊक बाजारात १३८ रुपये किलो असणारी तूर डाळ आता १४५ रुपयांवर पोहोचली आहे. मूग डाळ, मसूर डाळ यांच्या दरांतही किलोमागे दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात तूरडाळीच्या दरांत किलोमागे ३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत तूरडाळ ९५ ते १३५ रुपये किलोने विकली जात आहे तर, पुण्यातील स्थानिक बाजारांत या डाळीच्या दरांनी पावणेदोनशेचा टप्पा गाठला आहे. पुण्यात मूगडाळीसह सर्वच डाळींचे दर किलोमागे शंभरीपार पोहोचले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण होण्याऐवजी वाढच होत आहे. मुंबईसह राज्यभरात अनेक शहरांत टोमॅटोचे दर दीडशे रुपयांच्या आसपास आहेत. नागपूरमधील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर २०० ते २५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
कारले, दोडके, गिलके, भेंडी, ढोबळी मिरची आदींची आवक कमी होऊन दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.