डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेलाचं ‘पांढरं विष’! अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांतून भेसळयुक्त दूध — घरातच सुरु होतं रॅकेट
अन्न औषध प्रशासन कोमात? मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारे दूध माफिया जोमात!
मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा एक धक्कादायक आणि भयावह प्रकार अंधेरी पश्चिमेत उघडकीस आला आहे. कपासवाडी परिसरात स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट दूध तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाईंड तेल वापरून तयार केले जाणारे भेसळयुक्त दूध आढळून आल्याने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे.
नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांत ‘सिंथेटिक’ दूध
छाप्यात आरोपीकडे प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. या पिशव्यांमध्ये मूळ दूध काढून त्यात रसायनांची भेसळ करून पुन्हा पॅकिंग केल्याचा संशय आहे. हे दूध थेट घरगुती ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
व्हायरल व्हिडिओने उडवली प्रशासनाची झोप
या प्रकरणाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका खोलीत दुधाच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसत असून, आरोपी मेणबत्तीच्या आचेवर रसायने गरम करून दूध कसे भेसळयुक्त केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवताना दिसतो.
स्थानिकांच्या मते, हे रॅकेट अनेक दिवसांपासून सुरु होते, मात्र कारवाई उशिरा झाल्याचा आरोप होत आहे.
असं बनवलं जात होतं ‘सिंथेटिक दूध’
तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.
▪ दूध पांढरं आणि फेसाळ दिसावं यासाठी डिटर्जंट पावडर व साबण द्रावण
▪ दूध घट्ट आणि प्रथिनयुक्त भासावं यासाठी युरिया व इतर रसायने
▪ फॅट्स वाढल्याचा आभास देण्यासाठी स्वस्त रिफाईंड तेल
अवघ्या १ लिटर मूळ दुधात पाणी व रसायने मिसळून २ लिटर दूध तयार केलं जात होतं — कमी खर्चात जास्त नफा, हाच या माफियांचा धंदा!
पुरवठा साखळीवर मोठं प्रश्नचिन्ह
हे दूध डेअरीमधून थेट ग्राहकांपर्यंत जात नव्हतं.
मधल्या टप्प्यावर दूध गायब करून खासगी ठिकाणी नेलं जात होतं, तिथे पिशव्या फोडून भेसळ केली जात होती आणि पुन्हा नव्या पिशव्यांत भरून अंधेरीतील अनेक सोसायट्यांमध्ये खुलेआम विक्री केली जात होती.
आरोग्यावर भीषण परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, असे दूध पिणे म्हणजे हळूहळू मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
▪ लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटण्याचा धोका
▪ महिलांमध्ये कॅल्शियमची तीव्र कमतरता, हाडांचे आजार
▪ किडनी निकामी होणे, यकृत विकार
▪ पोटाचे कायमस्वरूपी आजार, त्वचारोग व डोळ्यांचे गंभीर विकार
FSSAI आदेशांनंतरही मुंबईत दूध माफियांचा सुळसुळाट
दूध भेसळ रोखण्यासाठी FSSAI ने देशभर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले असतानाच, मुंबईत घडलेला हा प्रकार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
नेटकऱ्यांसह नागरिकांनी दूध माफियांवर कठोर कारवाई आणि कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.