मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

मुंबई, एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम विदर्भात तब्बल 59 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून अनेक नद्या-नाले तुडुंब भरले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि कोल्हापूर घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पावसामुळे शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उपनगरात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाने NDRF आणि SDRF पथकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना ‘सचेत’ ॲपद्वारे सूचना पाठविण्यात येत आहेत. तसेच मंत्रालयीन नियंत्रण कक्ष 24x7 सुरु असून नागरिकांनी 022-22794229 / 22023039 किंवा मोबाईल क्र. 9321587143 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय काळजी घ्यावी?
• वादळी हवामानात घराबाहेर जाणे टाळा.
• इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा.
• झाडे, खांब, उंच वस्तूंपासून दूर रहा.
• नळ, पाण्याचे स्रोत वापरणे टाळा.
• अधिकृत हवामान अद्यतनावर लक्ष ठेवा.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की वादळ संपेपर्यंत सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी स्वतःची, कुटुंबीयांची व शेजाऱ्यांची सुरक्षितता प्राधान्याने जपावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.