नाशिक शहराचा पारा चढला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
 
नाशिकःनाशिक मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाका वाढल्याचा पाहायला मिळत आहे. सरासरी नाशिकचे तापमान हे 40°c पर्यंत पोहोचले आहे. त्यावेळी नाशिक शहरात उष्माघाताचे रुग्णा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात मागील तीन दिवसांपूर्वी ३८.९ अंश सेल्सिअस तापमान पोचले होते तर, ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हे स्थिर आहे. पुढील मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून शासनाच्या सूचनेनुसार उष्माघाताचे बेड तयार राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
  दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात १२, तर उर्वरित चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी चार असे एकूण २८ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आल्याची माहिती नाशिक मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
नाशिक रोड येथील ठाकरे रुग्णालयामध्ये १२ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आले आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात चार, मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयात चार, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय चार, तर मायको रुग्णालयामध्ये चार असे एकूण २८ बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका ची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे.
उष्माघाताचे लक्षणे आणि उपचार
लक्षणे पुढील प्रमाणे....
मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे. मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था.
उपचार पुढील प्रमाणे...
रुग्णास सावलीत आणावे, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावे. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्या. शरीराचे तापमान ३६.८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत उपचार सुरू ठेवावे.