नवी मुंबई विमानतळ, मेट्रो-३चा अंतिम टप्पा उद्घाटन — भारताच्या विकासाचे नवे इंजिन सुरू!

-प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व भुयारी मेट्रो-३ मार्गिकेचे लोकार्पण
-महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे पंख उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उभारणार प्रकल्प
नवी मुंबई :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो-३ मार्गिकेचा अंतिम टप्पा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, मुरलीधर मोहोळ, जपानचे राजदूत ओनो केइची व अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“नवी मुंबई विमानतळ म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचे नवे इंजिन” – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ हा केवळ विमानतळ नसून महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्का वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘प्रगती’ उपक्रमांतर्गत हा प्रकल्प गतिमान झाला. दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता या विमानतळात असून, “हा दिवस म्हणजे स्वप्नपूर्तीचा दिवस” असे त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाच्या निर्मितीत जपान सरकार आणि JICA संस्थेच्या सहकार्याबद्दलही आभार मानले. तसेच ‘मुंबई वन’ या सर्वसमावेशक ॲपमुळे मेट्रो, मोनोरेल, बस, रेल्वे आणि वॉटर टॅक्सी यांचे एकत्रित तिकीट मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“नवी मुंबई विमानतळ हे विश्वासाचे प्रतीक” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवीन भारतावरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे. 2014 साली मोदींनी देशाच्या विकासाची जबाबदारी घेतली, तेव्हा 74 विमानतळ होते आज ती संख्या 150 झाली असून 2030 पर्यंत 220 विमानतळांचा संकल्प आहे.
शिंदे म्हणाले, “देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो महाराष्ट्रात सुरू झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज आणि पीएम किसान योजनेतून 33,000 कोटींचे अनुदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
“व्यापार, गुंतवणूक, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण” – उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार म्हणाले की, या विमानतळामुळे केवळ प्रवास नाही तर व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. कुलाबा-बांद्रा-सीप्झ मेट्रो लाईनमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यांनी सांगितले, “मुंबई वन ॲप हे ‘वन मुंबई, वन ॲप’ या संकल्पनेचे मूर्त रूप असून प्रवास अधिक सुलभ व स्मार्ट होईल.”
“भारताच्या उड्डाणाला नवी गती” – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू
केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले की, नवी मुंबई हे नवीन आशा व उत्साहाचे प्रतीक आहे. ₹100 अब्ज गुंतवणुकीत उभारलेला हा विमानतळ 30,000 एकर क्षेत्रात पसरलेला असून 2 लाख रोजगार निर्माण करणार आहे.
“सर्वसामान्यांना परवडणारा हवाई प्रवास” – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
मोहोळ म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ हा प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा आणि सुलभ हवाई प्रवास उपलब्ध करून देईल. केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे महाराष्ट्रातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाच नजरेत
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: ₹100 अब्ज गुंतवणूक
• क्षमता: दरवर्षी 9 कोटी प्रवासी
• रोजगारनिर्मिती: 2 लाखांहून अधिक
• मेट्रो-३ मार्गिका: 40 किमी भुयारी प्रवास, दक्षिण ते पश्चिम मुंबई जोडणार
• ‘मुंबई वन’ ॲप: सर्व वाहतूक सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली
#NaviMumbaiAirport #ModiInMaharashtra #Metro3 #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #MaharashtraDevelopment