स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीला राज्य सरकारच्या एकही नेत्याला निमंत्रण नाही
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीला राज्य सरकारच्या एकही नेत्याला निमंत्रण नाही
नवी मुंबई, दि. २३ :- सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे याचे मलाही खंत वाटते, मी ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते, आजपर्यंतच्या सरकारकडून माथाडी कामगारांच हित कुठे जल गेलं, आणि म्हणूनच यावेळच्या स्व. आमदार अण्णासाहेबांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोक प्रतिनिधीला बोलावण्याची इच्छा झाली नाही. सध्या माथाडी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बोर्ड उदध्वस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे काम अन्यत्र हलविले जाते पण सरकारला याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगार मंत्री हे उदयोगपतीच होते आणि आताचेही आहेत मग कामगारांना न्याय कसा मिळणार अशी खंत संघटनेचे सरचिटणीस व   अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. ते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन, वाशी येथील माथाडी कामगारांच्या भव्य सभेमध्ये बोलत होते. पुढे   म्हणाले की, मराठा समाजाच्या ग्रामीण भागातील जनतेला आरक्षणापासून वंचित ठेवले, उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आजही सुस्थितीत आहे अण्णासाहेबांनी त्या काळात महाराष्ट्रात जागोजागी दौरे व मराठा समाजाला संघटित करून अखिल भारतीय मराठा संघाची स्थापना केली व 22 मार्च 1982 रोजी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे म्हणून मराठा समाजाचा विधांमंडळावर भव्य मोर्चा काढला, पण सरकारने त्याची दखल घेतली नाही म्हणून 23 मार्च 1982 रोजी अण्णासाहेबांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ही वस्तुस्थिती आहे. अनेक वर्षात मराठा समाजाचे जे आरक्षणासाठी भव्य आंदोलन चालू होतं आणि ज्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा सरकारला करण्यास भाग पडले त्याचे जनक अण्णासाहेबच आहेत,अण्णासाहेबांच्या निधनानंतर आमच्या संघटनेतील वादविवाद पुढे आले व आमच्या कुटुंबाची परवड झाली पण त्या सगळ्याला शिवाजीराव पाटील यांनी शह देऊन बलाढ्य संघटना आबाधित ठेवली, त्यांच्या निधनानंतर संभाजीराव पाटील आणि आता माथाडी कामगार कार्यकर्ते आणि आम्हा नेते मंडळींच्या माध्यमातून संघटने समोर निर्माण झालेल्या आव्हानांचा आम्ही सामना करत आहोत आता तर कारखानदार कॉन्ट्रॅक्ट देतात आणि कामगारांची पिवळणूक करतात खंडणीखोर अनेक संघटनांचे पेव फुटले आहे, पैसे दिल्याशिवाय बोर्डातील अधिकारी चेअरमन यांचे पान हालत नाही तर त्याहीपेक्षा जबरदस्त म्हणजे अण्णासाहेबांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक सरकारने आणले, त्याविरुद्धही आमचा लढा सुरूच आहे आणि जोपर्यंत माथाडी कायद्याविरुद्ध आणलेल्या   विधेयकाबाबत सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत माथाडी कायदा अबाधित ठेवण्यासाठी हा लढा सुरु राहणार आहे.   माथाडी चळवळीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, अनेकांना कायद्याची नावापुरती गरज आहे, आपण अण्णासाहेबांचे कौतुक करतो मात्र माथाडी चळवळीवर संकट आले की पुढाकार अण्णासाहेबांच्या संघटनेने घ्यावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते.   तर शरद पवार यांनी माथाडी कामगारांबाबत घेतलेली न्याय भूमिका आणि आजचे राज्यकर्ते यांची माथाडी विरोधी भूमिका याबाबत आत्ताच्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंचन करण्याची गरज आहे असे परखड मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन, नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगार मेळाव्यात माजी आमदार नरेंद्र पाटील बोलत होते.
या आदरांजली सभेत बोलताना संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी क्रांती केली, माथाडी कायद्याची निर्मिती करून लाखो कामगारांच्या कुटुंबांना आधार दिला, त्यांनी निर्माण केलेला हा माथाडी कायदा इतका महत्त्वाचा आहे की मध्यंतरी केंद्र व राज्य सरकार हा कायदा ऊस तोडणी कामगारांसाठी आणू शकतो का असा विचार केला स्व. यशवंतराव चव्हाण आणि इतर धुरंदर नेत्यांनी त्याकाळी निर्मिती आणि अंमलबजावणी केलेला हा कायदा इतका महत्त्वाचा आहे की कायद्याविरोधात कोणत्याही कोर्टात गेले तरी त्यांचा निभाव लागत नाही कायदा टिकून राहतो इतका भक्कम कायदा अण्णासाहेब पाटील आणि त्यांचे साथीदार काशिनाथ वाळवईकर आणि त्यांचे सहकारी यांनी निर्वाणीचा संघर्ष करून तत्कालीन सरकारला भाग पाडले, म्हणूनच आजच्या अण्णासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या व माझ्यातर्फे त्यांना अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. 
आपल्या प्रास्ताविक भाषणात संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप म्हणाले की, अण्णासाहेबांनी संघटनेच्या माध्यमातून माथाडी कायद्याची निर्मिती करून वंचित माथाडी कामगारांना रोजी रोटी मिळवून दिली व हमालीचे काम करणाऱ्या कामगारांना 'माथाडी कामगार' म्हणून सन्मान मिळवून दिला, त्यांची   सामाजिक दूरदृष्टी आणि विचारांचा आवका प्रचंड होता म्हणूनच चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या जोडत्वाला इतिहासात आजही अग्रस्थान आहे म्हणून आजच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मिळून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. 
मेळाव्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच अण्णासाहेबांच्या कन्या ऍडव्होकेट भारतीताई पाटील यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचेही   अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले.   या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, आनंद पाटील, रविकांत पाटील, कायदेशीर सल्लागार एडवोकेट भारतीताई पाटील, माजी नगरसेवक मनोज जामसुस्कर तसेच संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील अखिल भारतीय मराठा महासंघाचे अमळनेर जळगावचे पदाधिकारी विक्रांत पाटील, उद्योजक वसंतराव मानकुमरे, तसेच शुभांगी पाटील, शशिकला पाटील, ग्रोमाअसोसिएशनचे मयूर सोनी, विशालभाई, आदी मान्यवर व तमाम माथाडी कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.