राष्ट्रीय सुरक्षा दलाचं ‘सायक्लोथॉन’ — शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मरणार्थ ‘गर्भाशय कर्करोग जनजागृतीचा’ संदेश”

नवी मुंबई :
शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन (अशोकचक्र) यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने ‘गर्भाशय कर्करोग जनजागृती सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या सायक्लोथॉनने नवी मुंबईमार्गे पवईपर्यंत प्रवास करत राष्ट्रभक्ती आणि आरोग्यजागरूकतेचा संदेश दिला.
या उपक्रमात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः सहभागी होत मुंबई ते ज्वेल ऑफ नवी मुंबई (नेरूळ सेक्टर 26) हे 40 किमीचे अंतर फक्त 1 तास 31 मिनिटांत पूर्ण केले.
या ठिकाणी किंग हॉस्पिटल, मुंबईच्या डॉक्टरांनी गर्भाशय कर्करोगावरील पथनाट्य सादर करून महिलांच्या आरोग्यविषयी सविस्तर माहिती दिली.
⸻
“आरोग्यहिताय लोकजागृती ही खरी राष्ट्रसेवा” — डॉ. कैलास शिंदे
यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, “शहीद जवानांना आदरांजली वाहतानाच महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती करणे ही अत्यंत लोकहिताची बाब आहे.” त्यांनी कर्नल अभिषेक सिंह व त्यांच्या NSG सहकाऱ्यांचे कौतुक करत हा उपक्रम प्रत्येक शहराने अनुकरणीय ठरवावा, असे मत व्यक्त केले.
महापालिका आयुक्तांनी पुढे सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, लवकर निदान हाच बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने १४ ठिकाणी मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी मास स्क्रिनिंग सुरू केले आहे. आतापर्यंत ७० हजारांहून अधिक महिलांची तपासणी झाली असून, संशयित ७ महिलांना पुढील तपासणीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे.
तसेच नेरूळ रुग्णालयात १० बेड्सचा केमोथेरपी वॉर्ड सुरू करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
⸻
“शहीदांचं स्मरण आणि महिलांच्या आरोग्याचं संरक्षण हेच आमचं ध्येय” — कर्नल अभिषेक सिंह
या सायक्लोथॉन उपक्रमाबद्दल बोलताना कर्नल अभिषेक सिंह म्हणाले, “शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मरणार्थ आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सायक्लोथॉन राबवला आहे.”
⸻
या प्रसंगी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ. अजय गडदे, डॉ. अमोल पालवे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान, पोलीस, एनएसएस विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये गर्भाशय कर्करोगाविषयी जनजागृती व नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.