Nyaya Yatra Drone | भारत जोडो न्याय यात्रा आता मुंबईच्या उंबरठ्यावर; ड्रोनसह पॅराशूट ग्लायडिंगला प्रशासनाने घातली बंदी
 
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकली आहे. आज ठाणे जिल्ह्यात ही यात्रा असेल. खरेगाव टोल नाक्यावरुन राहुल गांधी ठाणे शहरात दाखल होतील. मणिपूर येथून सुरु झालेली ही यात्रा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. उद्या मुंबईत यात्रा दाखल होत आहे. आज दिवसभर ठाणे जिल्ह्यासह शहरात कॉर्नर बैठक आणि सभांचे आयोजन आहे. दरम्यान ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने यात्रेमुळे पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडविण्यास मनाई आदेश लागू केला आहे.
ड्रोन बंदी
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत 15 मार्च 2024 रोजी दाखल झाली. 16 मार्च 2024 रोजी यात्रा ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत असेल. राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय केला आहे.
यात्रेदरम्यान अंबाडी नाका परिसर, महापोली गाव परिसर, शेलार हनुमान मंदीर परिसर, नदीनाका शेलार तसेच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मौजे सोनाळे मैदान परिसरात यातायात होऊ नये, याकरिता या ठिकाणांमध्ये पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. 15 मार्च 2024 रोजी दुपारी 1.00 वाजेपासून ते 16 मार्च, 2024 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत या परिसरात ही बंदी लागू असेल. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (9) लागू आहे.
स्वागताचे झळकले बॅनर
राहुल गांधी उद्या मुंबईत दाखल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क , सेनाभवन परिसरात राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर्स झळकले आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा उद्या १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे.
महाराष्ट्र लढणार इंडिया जिंकणार, न्यायासाठी लढायचे, गद्दाराना नडायचे, साविधानाला टिकवायचं, सविधान बचाव, बेरोजगारी हटाव, किसान बचाव महंगाई हटाव, महिलाओ को न्याय दिलाव अशा आशयाचे बॅनर्स लागले आहेत.
राहुल गांधी यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात येत आहे. पूर्ण शिवाजी पार्क मैदान भरेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.