गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर मुंबई APMC फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या ७० हजार पेट्यांची आवक, दर उतरले
साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण नैवेद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंबा खरेदी करतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. त्यामुळे खवय्यांना पाडव्याला हापूस आंब्यांवर ताव मारता येणार आहे.
गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची   आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी गुडीपाढव्याला   होणारी आवक जास्त असल्याने आंब्याचे दर सुद्धा खाली आले आहेत. सध्या दिवसाला ६० ते ७० हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून साधारण ६० हजार हापूस पेटी येत असून १० ते १५ हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमधून दाखल होत आहेत.
आवक वाढल्याने आंब्याचे दर उतरले
आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा ६०० ते १२०० रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा ४०० ते एक हजार रुपयाने विकला जात आहे.
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंबा बागायतदारांकडून व्यवसायाची सुरुवात
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टरवर आंबा बागा असून त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात दाखल होतात. सर्वसामान्यांपासून प्रत्येक जण यावेळी आंबा खरेदी करतो. यंदा कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या वाढली आहे. शिवाय इतर राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर सुद्धा कमी झाल्याने ग्राहकांना मनमुरादपणे आंबा खाता येणार आहे.
बाईट : बाळासाहेब बेंडे -हापूस आंबा व्यापारी