कांद्याच्या दरात दुपटीने वाढ, किरकोळ मधे 50 रुपया किलो
 
यंदा पाऊस लांबल्याने कांदा पिकाला उशीर झाला. त्यामुळेच किमंतीमध्ये वाढ होताना दिसत आहे.
देशभरात कांद्याचे भाव वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी २५ रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता ५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे. दरम्यान, मागील महिन्यात केंद्राने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी आणि व्यापारी रस्त्यावर उतरले होते. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे.
सणासुदीच्या तोंडावर बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये गेल्या आठ दिवसापासून कांदा दरात सुधारणा होत असून अडीच हजारांवर स्थिर असलेला कांदा गुरुवारच्या लिलावात किमान ५०० ते कमाल ४२०० रुपयांपर्यंत गेला असून शेतकऱ्यांना सरासरी ३५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर देशभरात बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ५० रुपये किलोने कांदा खऱेदी करावा लागत आहे.
साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे नवीन उत्पादन येते. पण यंदा पाऊस उशिरा आल्याने कांदा लागवडीला विलंब झाला. राज्यात अनेक भागात एक ते दीड महिना उशिरा कांद्याची लागवड झाल्याने काढणीसही उशीर होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याच्या दरात काहीशी घसरण होऊ शकते कारण तोपर्यंत नवीन उत्पादन निघण्यास सुरुवात होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.