Orange News: संत्रा प्रक्रिया प्रकल्प गेमचेंजर ठरणार -अजित पवार
 
मुंबई : ‘‘विदर्भातील संत्रा उत्पादकांना रास्त भाव देण्यासाठी वरुड-मोर्शी येथील अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. हा प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी गेम चेंजर ठरेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच ‘‘या प्रकल्पासाठी निधी दिला जाईल,’’ असेही ते म्हणाले.
या वेळी आमदार देवेंद्र भुयार, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (दूरदृष्य प्रणालीव्दारे), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक मंगेश गोंदवले, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. केदार जाधव, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक के. एस. मुळे, विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनीचे अमित जिचकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘अमरावती विभागात संत्रा लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. तेथील संत्रा उत्पादकांना काही वेळेस अत्यल्प दरात संत्रा विक्री करावी लागते. संत्र्यांवर अत्याधुनिक सयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्शिअल ऑइल, पिल पावडर, पशू खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादने केल्यास त्यापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळू शकतो.’’
‘‘संत्रा उत्पादकांना न्याय देण्यासाठी वरुड-मोर्शी येथे विदर्भ अग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासमवेतच्या भागीदारीद्वारे संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येईल. संत्रा उत्पादकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक निधीही देण्यात येईल,’’ अशी ग्वाही पवार यांनी दिली.