Orange Subsidy : संत्रा अनुदान व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावे
 
Orange News Update :   आंबिया बहारातील संत्रा निर्यातीसाठी १८० कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली होती. मात्र हंगाम संपल्यानंतर देण्यात येणाऱ्या या अनुदानामुळे केवळ निर्यातदार व्यापाऱ्यांचेच हित साधले जाणार आहे. परिणामी तसे न करता त्याऐवजी मृग बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकरी २० हजार रुपयांची तरतूद केली जावी, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने केली आहे.
नागपुरी संत्र्याचा बांगलादेश हा एकमेव आयातदार आहे. गेल्या आंबिया हंगामात बांगलादेशने आयात शुल्कात मोठी वाढ केली. प्रतिकिलो ८८ रुपये असे आयात शुल्क आकारण्यात येत होते. परिणामी अमरावती, नागपूर या भागातून होणारी संत्रा निर्यात प्रभावित झाली. त्याचा फटका बसत दर दबावात आले. गेल्या हंगामात आंबिया बहारातील फळांचे व्यवहार अवघे १५०० रुपये क्विंटलने झाले. याच हंगामातील फळांना दरवर्षी साधारणतः २००० ते २५०० रुपयांचा दर मिळतो. आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी शासनस्तरावरून अनुदानाची मागणी केली होती. त्याची दखल घेत शासनाने हिवाळी अधिवेशनात संत्रा उत्पादकांसाठी अनुदानाची घोषणा देखील केली. नुकताच या अनुदानाच्या वितरणाचा आदेश काढण्यात आला. मात्र या आदेशाचा कोणताही फायदा संत्रा बागायतदारांना होणार नाही.
व्यापाऱ्यांनी आयात शुल्क वाढल्याचा कांगावा करीत कमी दराने फळांची खरेदी केली. त्यानंतर त्यांचा नफा जोडून बांगलादेशला निर्यात केली. त्यामुळे त्यांचे कोणतेच नुकसान झाले नसताना त्यांनाच अनुदान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आंबिया बहारात जे काही नुकसान व्हायचे होते ते झाले. त्यामुळे शासनाला अनुदान द्यायचे असल्यास आता मृग बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांना ते दिले पाहिजे. मृग बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जेमतेम २० हजारांवर आहे. त्यांच्यासाठी पाच एकराच्या मर्यादेत प्रतिएकरी २० हजार रुपये अनुदान थेट खात्यात जमा करावे. १८० कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ त्यातून शेतकऱ्यांना होईल.
श्रीधर ठाकरे,
कार्यकारी संचालक, महाऑरेंज