परराज्यातील आवकेमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबास दराचा झटका
 
-गुजरात, राजस्थानसह देशभरातील डाळिंबाची बाजारपेठेत आवक होऊ लागल्याचा फटका महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना बसत आहे.
सांगली   : गुजरात, राजस्थानसह देशभरातील डाळिंबाची बाजारपेठेत आवक होऊ लागल्याचा फटका महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना बसत आहे. देशभरातील बाजारपेठांत गेल्या दोन महिन्यांत डाळिंबाच्या दरात प्रति किलोस ३० ते ४५ रुपयांनी घट झाली आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यापर्यंत डाळिंबाचे हेच दर स्थिर राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
गुजरात राज्यातील निम्म्या भागाला पावसाचा फटका डाळिंबाला बसला असला तरी एका भागातील डाळिंब चांगले आहे. तर, राजस्थान राज्यात डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर, देशात यंदाच्या मृग बहरातील डाळिंबाची काढणी आणि विक्री सुरु झाली आहे.
हंगामाला गतीही आली आहे. दिवाळीपूर्वी डाळिंबाला दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये असा दर मिळत होता. यंदा पाणी टंचाईमुळे बाजारपेठेत डाळिंब आवक कमी होऊ दरही चांगले मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढल्याने अपेक्षित उठाव झाला नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला. डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १३५ रुपये असा दर मिळाला.
यंदाचा हंगाम सुरु होऊन दोन महिनांच्या कालावधी झाला आहे. हंगामाच्या प्रारंभाला १६० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला. मात्र, दक्षिणेत पाऊस पडल्याने मागणी कमी झाली. त्याचा परिणाम डाळिंबाच्या उठावावर झाल्याने दरात २० ते २५ रुपयांनी घट झाली.
दरम्यान डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून गुजरात, राजस्थान या दोन्ही राज्यातील डाळिंब देशांतर्गत बाजारपेठेत आवक सुरु झाली. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा प्रति किलोस १० ते २० रुपयांनी घट झाली. अर्थात दोन महिन्यात ३० ते ४५ रुपयांनी दर कमी झाल्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.