पुण्यात 2 वर्षं रिमोटने चालत होती वीजचोरी! भोसरीतील उद्योगपतीला 19 लाखांचा महावितरणचा दंड

पुणे – महावितरणच्या तपासणी पथकाने भोसरी एमआयडीसीमध्ये तब्बल 77,170 युनिट वीजचोरीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे ही वीजचोरी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मागील 2 वर्षांपासून सुरू होती. कारवाईदरम्यान संबंधित उद्योगाला 19 लाख 19 हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, 2 लाख 30 हजार रुपयांचे तडजोड बिलही आकारण्यात आले आहे.
‘गणेश प्रेसिंग’ या औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वीज वापरण्यात येत होती. महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिलेल्या निर्देशांनंतर पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई झाली.
गणेशखिंडचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड आणि भोसरीचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी तपासणीसाठी विशेष पथक तयार केले होते. सहाय्यक अभियंता गजानन झापे, तसेच वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांच्या सहकार्याने ही तपासणी पार पडली.
वीजचोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले असून, महावितरणच्या या कारवाईमुळे इतर वीजचोरांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात वीजचोरी थांबवण्यासाठी महावितरणकडून सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे.
• 77,170 युनिट वीजचोरी
• 2 वर्षे रिमोटने वीजचोरी सुरू
• 19.19 लाखांचा दंड
• 2.30 लाखांची तडजोड रक्कम
• महावितरणची विशेष मोहीम तीव्र