सरकारला खडेबोल सवाल, नंतर सर्वपक्षीय बैठक अर्धवट सोडून संभाजीराजे ‘सह्याद्री’तून का निघाले?
मुंबई: मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने आज रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित होते. ही बैठक सुरु झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर संभाजीराजे सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांना यावेळी प्रतिक्रिया दिली. आपण बैठकीत बाजू मांडून सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर आलो, असं संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच कायद्यात बसत असेल तर कुणबी आरक्षण द्या, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीला मला आमंत्रित केलं होतं. मी माझा मुद्दा तिथे स्पष्टपणे मांडून निघालो आहे. माझ्या पंजोबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण कोल्हापूर संस्थानमध्ये दिलं होतं. बहुजन समजाला 1902 ला आरक्षण दिलं. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होतो. म्हणून मी 15-20 वर्षांपासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे काय-काय म्हणाले?
“गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. ते सलग तीन-चार वर्षांपासून उपोषणाला बसत आहेत. मी सुद्धा त्यांना उपोषणस्थळी भेट देत असतो. सरकार दरवर्षी त्यांना काहीतरी आश्वासन देतात. त्यानंतर एक वर्ष पुढे जातं. यावेळी सुद्धा मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारलं. यावेळी अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं”, असं संभाजीराजे म्हणाले.