ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर PPE किट घालून दरोडा, 5 कोटींचे दागिने लंपास
 
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या   ICICI होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर मोठा दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांनी 222 खातदारांचे लॉकर्स फोडून तब्बल 5 कोटी रुपयांचे दागिने पळवले आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर   ICICI होम फायनान्सच्या खातेधारकांमध्ये चिंता आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. 
नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकात ICICI होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय आहे. मात्र हा परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात सतत लोकांची वर्दळ असते. मात्र तरीही चोरट्यांनी याठिकाणी दरोडा कसा पडला? यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरोडा घातला तेव्हा चोरट्यांची ओळख पटू नये म्हणून पीपीई किट घातल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे., संस्थेचं कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. त्यामुळे कोणालाही थांगपत्ता लागू न देता चोरटे तिथपर्यंत पोहोचले कसे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.