साताऱ्यात खळबळ: “माझ्यावर चार वेळा बलात्कार केला…” — पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत तरुण डॉक्टरची आत्महत्या!
सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरने काल रात्री आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात अधिक धक्कादायक बाब म्हणजे, मृत डॉक्टरने आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचे, तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
हातावर लिहिली सुसाईड नोट
आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे नमूद केली होती.सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे
“PSI गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केला.”
या नोटमधील मजकूर पाहता आत्महत्येमागे मानसिक ताणाबरोबरच लैंगिक अत्याचार आणि सततचा त्रास हे कारण असल्याचे स्पष्ट होते.
“माझ्यावर अन्याय होतोय” अशी केली होती तक्रार
मृत डॉक्टरने यापूर्वी आपल्या वरिष्ठांकडे “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी तक्रार केली होती, असेही समजते. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरूच होती. या चौकशीमुळे आणि पोलिसांकडून होत असलेल्या वागणुकीमुळे त्या तणावाखाली होत्या.
पोलीस तपास सुरू
घटनेनंतर सातारा पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, सुसाईड नोटमधील मजकूर आणि डॉक्टरच्या मोबाईलमधील माहितीचा तपासही सुरू आहे.
या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून, पोलिस अधिकाऱ्यांवर लागलेल्या आरोपांमुळे पोलिस विभागातही खळबळ उडाली आहे.