कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून शरद पवार, राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
नाशिक: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून आज   (ता.१४) नाशिकच्या चांदवडमध्ये आली. यावेळी झालेल्या सभेतून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. शरद पवार यांनी, केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज घेऊन आत्महत्या करत आहेत. तर कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संकटात सापडा आहे, अशी टीका केली आहे. तर राहुल गांधी यांनी, १० वर्षात मोदींनी १६ लाख कोटी २०-२२ उद्योगपतींचे कर्ज माफ केले मात्र शेतकऱ्यांचे कोणतेच कर्ज माफ केले नाही असा हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादकासह सामान्य शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. मात्र यावर केंद्रातील मोदी सरकारकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. यामुळेच शेतकरी कर्ज घेऊन आत्महत्या करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, देशातील शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. मात्र या मोदी सरकारला याचे काही पडलेले नाही. कर्जमाफीबाबत काही बोलत नाही. पण आम्ही ७० हजार कोंटीचे कर्ज माफ केले.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.