आमदार अपात्रतेचा निकाल लागताच शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; उद्धव ठाकरे यांना दिला मोठा सल्ला
 
आमदार अपात्रतेचा निकाल लागताच शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांना दिला मोठा सल्ला
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला आहे. नार्वेकर यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. मात्र, शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल असं अजिबात वाटत नव्हतं. त्याला अनेक कारणं आहे. सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी निकाल काय लागणार याचं भाष्य आधीच केलं होतं. मुख्यमंत्र्यांनीही निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असं भाष्य केलं होतं. निकाल त्यांच्या बाजूने लागेल याची त्यांना खात्री होती. ती खात्री निकालात दिसेल असं ध्वनित केलं होतं. तसाच निकाल लागला. निकाल वाचल्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्यावर याबाबतची अधिक स्पष्टता येईल. हा निकाल पाहिल्यावर उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, असा सल्ला देतानाच कोर्टातही ही केस सोयीची होईल. त्यांना तिथे न्याय मिळेल अशी खात्री या निकालाच्या निर्णयावरून दिसते, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
पक्ष संघटना महत्त्वाची
विधीमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना यावर निकाल आला आहे. यात विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिलं आहे. मात्र, सुभाष देसाई विरुद्ध राज्य सरकारच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी पक्ष संघटना महत्त्वाची आहे, असा निर्णय दिला आहे. पक्ष उमेदवारांची निवड करतो, पक्षच उमेदवारांना लढण्यास उद्युक्त करतो. त्यांना जे निवडतात त्यांचं मत महत्त्वाचं आहे. पक्ष संघटना आणि विधीमंडळ पक्ष यात पक्ष संघटना महत्त्वाची आहे, असं सुभाष देसाईंच्या केसमध्ये निकाल देण्यात आलेला आहे, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधलं
व्हीपचा अधिकार पक्षालाच
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात व्हीप किंवा आदेश देण्याचा आदेश पक्ष संघटनेला असल्याचं म्हटलं. विधीमंडळ पक्षाला नाही. त्यामुळे व्हीपची निवड उद्धव ठाकरे यांच्या संघटनेने केलेली नाही. हे या जजमेंटमध्ये स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोर्टाचं भाष्य महत्त्वाचं
सुभाष देसाईंच्या केसमध्ये कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलं होतं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला निकाल देता आला असता. ते पदावरच नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. कोर्टाचं हे भाष्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे अपीलात गेल्यावर उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल असं वाटतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.