शिळफाटा बनला ‘भेसळखोरांचा अड्डा अन्न औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

नवी मुंबई / शिळफाटा –
शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे व अपायकारक अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांचा उघडपणे व्यवसाय सुरू असून, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप मराठी कामगार सेनेने केला आहे.
राज्य उपाध्यक्ष श्री. दत्ता भाऊ पुजारी यांनी स्वतः काही कारखान्यांवर अचानक धाडी टाकून परिस्थितीची पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
उजेडात आलेले प्रकार:
• उत्पादनासाठी सडलेली व निकृष्ट दर्जाची कच्ची सामग्री वापर
• घाणेरड्या व अस्वच्छ वातावरणात फरसाण, वेफर्स, कुरकुरे, डाळीचे पदार्थ उत्पादन
• पुनर्वापरातील खराब तेलात केळी वेफर्स व कुरकुरे तळले जात आहेत
• कामगार कोणतीही स्वच्छता, सॅनिटरी उपकरणे न वापरता काम करत आहेत
स्थानिक अन्न व औषध प्रशासन, अन्न भेसळ विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग हे सर्वच या प्रकारांकडे उघडपणे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठी कामगार सेनेने तातडीने शिळफाटा, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील सर्व अन्न उत्पादक कारखान्यांची तपासणी करून भेसळखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी अशा बेदरकार पद्धतीने खेळ करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही,” असा इशारा दत्ता भाऊ पुजारी यांनी दिला.