पाकिस्तानातून दुबईमार्गे तस्करीचा डाव उधळला JNPT वर DRI ची मोठी कारवाई - 39 कंटेनर जप्त

नवी मुंबई एपीएमसी न्यूज नेटवर्क :
पाकिस्तानातून दुबईमार्गे तस्करीचा डाव उधळला! JNPTवर ९ कोटींचा माल जप्त ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत DRI ची मोठी कारवाई. पहलगाम येथे २ मे २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा वळसा घालून येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी लागू केली होती. मात्र, काही आयातदारांनी या बंदीचा फज्जा उडवत बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानातून दुबईमार्गे भारतात माल आणण्याचा प्रयत्न केला. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) हे मोठे षड्यंत्र उघडकीस आणत १,११५ मेट्रिक टन वजनाचा आणि ९ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत करण्यात आली असून, Nhava Sheva (JNPT) बंदरावरून एकूण ३९ कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एक आयातदार अटकेत आहे, तर पाकिस्तान व युएई येथील नागरिकांचा सहभाग असल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
कसा फोडला डाव?
DRI च्या तपासानुसार, पाकिस्तानातील कराची बंदरातून हा माल प्रथम दुबईतील जाबेल अली पोर्टवर नेण्यात आला. तेथून तो दुसऱ्या जहाजांद्वारे आणि नव्या कंटेनर नंबरसह भारतात पाठवण्यात आला. बनावट शिपिंग कागदपत्रांद्वारे या मालाचे मूळ ‘यूएई’ दाखवण्यात आले होते. परंतु, बारकाईने केलेल्या तपासात या मालाचे मूळ पाकिस्तानात असल्याचे उघड झाले.
अवैध आर्थिक व्यवहारांचा उलगडा
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात DRI ला काही ठोस आर्थिक पुरावे हाती लागले असून, पाकिस्तानमधील संस्थांशी थेट व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.
DRI चा इशारा
DRI ने यापूर्वीही ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमांतून देशाच्या सीमाशुल्क कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. आता ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’मधून देशाच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेची प्रभावीपणे राखण होत आहे. भविष्यात पाकिस्तानातून कोणताही माल तृतीय देशांतून वळसा घालून आणण्याचा प्रयत्न झाला, तरी कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.