जावईच उठला सासूच्या जीवावर , दारूच्या नशेत केले महाप्रताप , 100 क्विंटल कापूस जाळला
 
यवतमाळ :जावईच उठला   सासूच्या   जीवावर उठला असा म्हणावे लागेल   , दारूच्या नशेत या जावयाने महाप्रताप करून ठेवले . संपूर्ण   गाव झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी एका घरातून आगीचे लोळ उठले. पाहता पाहता या घरातील १०० क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान यामध्ये झाले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथे घडली. विशेष म्हणजे, मक्त्याने केलेल्या शेतातून ,दुसऱ्याच्या शेतात घाम गाळून पिकविलेला हा कापूस होता.
उत्तरवाढोणा येथील शोभा प्रभाकर   धांदे या महिलेने बबन शेंडे यांचे १८ एकर शेत मक्त्याने घेतले होते. त्यात कपाशीची लागवड केली. त्यांना या हंगामात चांगला कापूसही झाला. नजीकच्या काळात कापसाचे भाव वाढतील या आशेने शोभा यांनी आपल्या घरात हा कापूस साठवणूक करून ठेवला होता .हा कापूस विक्की ऊर्फ महेश रायकुवार याने दारूच्या नशेत पेटवून दिला. पाहता पाहता कापसासोबत घरानेही पेट घेतला. यामुळे संपूर्ण गावाला आगीचा धोका निर्माण झाला होता. घरातून धूर निघायला लागल्याने नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. मिळेल त्या साधनाचे आधारे आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.या घटनेत पूर्ण कापूस जळून राख झाला. शिवाय घरातील साहित्याचाही कोळसा झाला. सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले..
या प्रकरणी शोभा प्रभाकर धांदे यांनी लाडखेड पोलिसात तक्रार दिली. जावई विक्की ऊर्फ महेश रायकुवार याच्याविरोधात लाडखेड पोलिसांनी कलम ४३५ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.जावयाला न्यायालय यथोचित शिक्षाही देईल   पण जळालेला कापसामुळे झालेले नुकसान कोण भरून देणार असा प्रश्न शोभा यांच्या पुढे निर्माण झाला आहे .