ST Bus Strike : लाल परी थांबली, प्रवाशांचे हाल; तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती?
मुंबई : राज्यभरातील एसटीच्या (Maharashtra ST Bus Strike) विविध संघटनांनी संप पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या काळात लाल परीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो संख्येने नागरिक कोकणात आणि आपआपल्या गावी जात असतात. मात्र लाल परींच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील लालपरी म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१मध्ये मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जवळपास दोन महिने दिवस बसची चाके थांबली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने ऐन गणेशोत्सव काळात एस्टी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सर्वच एसटी कर्मचारी चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने एसटी सेवा ठप्प झाली आहे.
कोणकोणत्या आगारात बससेवा ठप्प:
३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत.
मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत.
विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.
खान्देशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.