कोल्ड स्टोरेजमध्ये फक्त साठवणूक करा ,यापुढे व्यापार केला तर लागणार टाळा
कोल्ड स्टोरेजमध्ये फक्त साठवणूक करा ,यापुढे व्यापार केला तर लागणार टाळा
-फळ मार्केटच्या   व्यापारी ,माथाडी कामगारांनी कोल्ड स्टोरेजमधील अवैध व्यापाराविरोधात काढला मोर्चा
-कोल्ड स्टोरेजमधील अवैध व्यापारामध्ये फळ मार्केटच्या काही व्यापाऱ्यांचा सहभाग
-इराण ,अफगाणिस्तानमधील नागरिक येथे बिनधास्तपणे करतात व्यवसाय ,स्थानिक व्यपाऱ्यांचा छुपा पाठिंबा
-अवैध व्यापाऱ्यामुळे शेतकरी ,व्यापारी व माथाडी कामगार अडचणीत
-नोकरीची चिंता सोडा मला ऍक्शन पाहिचे शशिकांत शिंदे यांनी दिली APMC अधिकाऱ्यांना सूचना
-आज पासून धंदा बंद करा नाही तर कायमचं   बंद करून टाकू - शशिकांत शिंदे  
Fruit Traders protest : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांच्या अनधिकृत व्यापारामुळे शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार अडचणीत आले आहेत,आता इराण ,अफगाणिस्तानमधील नागरिकांनीही येथे बिनधास्तपणे व्यवसाय सुरु केला आहे. दिवसभरात जवळपास १०० कंटेनर मधून येणाऱ्या फळांची विक्री या कोल्ड स्टोरेज मधून होत आहे . वारंवार शासनाकडे तक्रार करूनही शासन व प्रशासन काहीही कारवाई करत नाही. त्यामुळे आज शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे व्यापारी ,माथाडी कामगारांनी फळ मार्केटमधून मॅफ्को, कोल्ड स्टोरेज पर्यंत मोर्चा काढला होता . या मोर्चासाठी एपीएमसी पोलिसांतर्फे मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात GHK कोल्ड स्टोरेज मध्ये झाली. व्यापारी ,माथाडी कामगारातर्फे   कोल्ड स्टोरेज मध्ये होणारा अवैध व्यापार बंद करा, नाही तर टाळे लावू असा इशारा देण्यात आला. कोल्ड स्टोरेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमलेली गर्दी बघून कोल्ड स्टोरेजच्या   मालकांनी आलेल्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली, यावेळी त्यांनी सांगितलं की, मार्केटचे काही व्यापारी व ग्राहकांचा यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे या कोल्ड स्टोरेज मध्ये व्यापार होत आहे. या नंतर आमदार शशिकांत शिंदे ,बाळासाहेब बेंडे ,संजय पानसरे यांना कोल्ड स्टोरेज मालकांनी आश्वासन दिले की, या पुढे कोल्ड स्टोरेज मध्ये व्यापार होणार नाही , काही दिवसात बाजार समितीमध्ये एक बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीत जो निर्णय होणार असल्याची माहिती आमदार शशीकांत शिंदे यांनी दिली आहे . तसेच बाजार समितीच्या दक्षता पथकाला सूचित करण्यात आले आहे की, तुम्ही कारवाई करा, जे तुम्हाला अडवणार त्यांचा आम्ही कार्यक्रम करू. सर्व माथाडी कामगार तुमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे तुम्ही कोल्ड स्टोरेज मध्ये होत असलेले अवैध व्यापार बंद करा. नोकरीची चिंता सोडा, मला ऍक्शन पाहिजे असा इशारा यावेळी शिंदे यांनी उपस्थित बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना दिला.
बाजार समिती परिसरात मॅफ्को मार्केट व एमआयडीसीमध्ये   एकूण ५० पेक्षा जास्त   विविध कंपन्यांची कोल्ड स्टोरेज आहेत. शेती व इतर मालांचा साठा करण्याची परवानगी या कंपन्यांना देण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत अनेक कोल्ड स्टोरेज चालकांनी त्यांची जागा अनधिकृत फळ व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमधील व इतर व्यापारी अनधिकृतपणे फळांचा व्यापार करू लागले आहेत.त्यामुळे शेतकरी ,प्रामाणिक व्यापारी व माथाडी कामगार अडचणीत आले आहे .